प्रेमाचा उपकार
प्रेमाचा उपकार
धडा 1
यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, “जखर्या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. ‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”
तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” इकडे लोक जखर्याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले; तो त्यांना खुणा करत होता. तो तसाच मुका राहिला.
मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसांनंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने एकान्तात राहिली; ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.”
नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला
अलीशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बालकाची सुंता करण्यास आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखर्या ठेवणार होते; परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.” ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगांत कोणी नाही.” मग, “ह्याचे काय नाव ठेवायचे आहे,” असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून ‘ह्याचे नाव योहान आहे,’ असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणार्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.
धडा २
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे : “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’ तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले; त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही;
त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.
त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.” तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले; हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
धडा ३
हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की, ‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’ तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली; आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पाहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.” मग तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला; आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला; “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे” हे जे प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. बेथलेहेम येथील मुलांची कत्तल तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले. यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे : “रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.” मिसराहून परतणे पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद ह्याच्या जागी यहूदीयात राज्य करत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला, आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतास निघून गेला, व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे; (म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,) आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचा यज्ञ करावा. नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
धडा ४
तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. त्याचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमेस जात असत. आणि तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले; नंतर नातलग व ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला. परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’
तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता; आणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखर्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे - “‘अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा नीट करा; प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील, आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.
धडा ५
[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्वकाही त्याच्या द्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो : “‘जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता,’ असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे.” त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’
दुसर्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे, कारण ‘तो माझ्यापूर्वी होता’ असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.” आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मल्खीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा, तो मत्तिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा, तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा, तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरूब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा, तो मल्खीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा, तो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकीमाचा, तो मलआचा, तो मिन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,
तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा, तो अम्मीनादाबाचा, तो अरामाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा, तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा, तो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा, तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा, तो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा, तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.
धडा ६
तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले.मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”परंतु त्याने उत्तर दिले की,‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;आणि त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की,‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नयेम्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, ‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला.
नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत. मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे : “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.” मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.” तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले; ते म्हणू लागले, “हा योसेफाचा पुत्र ना?”
त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.”’ पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलीयाच्या दिवसांत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी त्यांच्यातील एकीच्याहीकडे एलीयाला पाठवले नव्हते; तर ‘सीदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे’ मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र शुद्ध झाला.” हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले, आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
धडा ७
पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे, त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला; आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला; हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनार्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.” येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
नंतर तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते; त्यांत दोन-दोन, तीन-तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा,” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्याने जेव्हा चाखले, (तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणार्या चाकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.” येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत.
धडा ८
मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला. आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणार्यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.” ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?” तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. वल्हांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता; शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.
परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. ‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.1 देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो; आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव तो आत्मा मोजूनमापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.
धडा ९
येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले, (तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य करत असत), तेव्हा तो यहूदीया सोडून पुन्हा गालीलात गेला; आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले. मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता. तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.
येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्याला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.”
ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.”
इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.” परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.” ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?” येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा. ‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.”
“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.” मग त्या दोन दिवसांनंतर तो तेथून गालीलात निघून गेला. कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, ‘संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.’ म्हणून तो गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.” तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.” ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.” ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहूदीयातून गालीलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.
धडा १०
त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत; कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.] तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या दुखणेकर्याने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो. ”येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बाथ होता.
ह्यावरून यहूदी त्या बर्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.” त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”त्यांनी त्याला विचारले, “‘आपली बाज उचलून चाल,’ असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे?” तो कोण आहे हे त्या बर्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” त्या माणसाने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.” ह्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागून त्याला जिवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे. येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे.” ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे.
ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले : मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले; आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.
मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही, आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही; कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही. मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही. परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हांला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता, तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल?”
धडा ११
तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो.” तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!” नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले. मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. “तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले, व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.” नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला. आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले. मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.
धडा १२
तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत: करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे.कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस.
‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते. मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे;’ पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.
‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे.
आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैर्याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैर्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’
धडा १३
माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.
तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’ कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.
कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? म्हणून अति लहान गोष्टदेखील जर तुमच्याने होत नाही तर इतर गोष्टींविषयी का चिंता करत बसता?
तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
धडा १४
तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.
द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.” त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हांला फाडतील.
मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’? मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.
खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”
येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.
धडा १५
मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले, आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.
काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारातदेखील त्यांना जागा होईना; तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की, ‘हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?’ ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने1 लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा ‘ऊठ, आपली बाज उचलून चाल,’ असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला) मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.” मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
तो तेथून निघून समुद्रकिनार्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. त्यानंतर तो बाहेर पडला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.” येशूने त्यांना म्हटले, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; त्या दिवसांत ते उपास करतील.” आणखी त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला: “कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात.” जुना द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.”
धडा १६
त्या वेळी एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून गेला; तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.” त्याने त्यांना म्हटले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता. आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही; म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभू आहे.”
नंतर दुसर्या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री व परूशी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! ह्यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.” मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.
पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले. आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल, आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.” मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहूदीया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सीदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतूनही मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.” तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.”
धडा १७
त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले. तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की, त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
तो कफर्णहूमास गेला. तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे; कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.” तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही; ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्या लोकसमुदायाला म्हणाला, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.” मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.” त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.
नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.
परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.” “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.” तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?” मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
धडा १८
पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते; आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.
मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.” तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता. पण मी जर बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन;’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.
मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही. ‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते. अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.” “त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला.
मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!” तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!” तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.” तेव्हा त्याने सांगणार्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.” हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”
धडा १९
पुन्हा तो समुद्रकिनार्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला; म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला; आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला, “ऐका; पाहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले; आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” मग तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे; परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते; ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.” कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणारच नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये व वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हांला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.
तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्वफळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’ तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”
नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.” त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.
आणखी तो म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.” आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला, तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की ‘आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्या कोणाएका व्यापार्यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्या गृहस्थासारखा आहे.” असले पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.
आणखी तो त्यांना म्हणाला, कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही; तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको.” पुन्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
धडा २०
येशू दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.” त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला.
मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.” त्याने दुसर्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये;” परंतु तो म्हणाला, “प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” त्यावर आणखी एकाने म्हटले, “प्रभूजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.” येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.”
त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. ' तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”
मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडेतुकडे केले होते; आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला; आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” कारण तो त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ.”
त्याने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.” आणि “आम्हांला ह्या देशातून घालवू नकोस” अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला पाठवून दे.” मग त्याने त्यांना परवानगी दिली; तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरांत शिरले, आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’ परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.
धडा २१
तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे; तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते.
तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री, तिने बर्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. कारण ती म्हणत होती, “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?” त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले?” मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?” ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.” तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.” तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.” तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.
धडा २२
नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवले.
ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.
पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील, आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.” भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत. गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील? ह्यास्तव त्यांना भिऊ नका;
इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल. कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.” मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करत गावोगावी फिरू लागले व लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून बरे केले. ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
धडा २३
ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावांत जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.”तेव्हा येशू आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?”
तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.” नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुलेदेखील होतीच. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”
मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू नंतर, ‘मी लोकसमुदायांना निरोप देतो आहे तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा,’ असे शिष्यांना लगेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्तात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनार्यापासून बर्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता; पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले; कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.”
तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला; परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” मग ते मनातल्या मनात फारच आश्चर्यचकित झाले. कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनार्यास पोहचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले. आणि ते आसपासच्या सर्व भागांत चोहोकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकर्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते दुखणेकर्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत; आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत.
धडा २४
दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते.तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरूजी, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.” म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हांला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे; आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.” ‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” तेव्हा यहूदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुमच्यामध्ये कित्येक आहेत.” कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान आहे.” हे तो शिमोन इस्कर्योत ह्याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता.
धडा २५
ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही. यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून तू येथून निघून यहूदीयात जा. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही; तू ही कामे करत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “माझा समय अजून आला नाही; तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो. तुम्ही वर सणाला जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्या सणास जात नाही.” असे त्यांना सांगून तो गालीलात राहिला.
त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला. तेव्हा यहूदी त्या सणात त्याचा शोध करत होते व म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?” लोकसमुदायांतही त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे;” कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांना फसवतो.” तरी यहूद्यांच्या भीतीमुळे त्याच्याविषयी कोणीही उघडपणे बोलला नाही. मग अर्धा सण आटोपल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. ह्यावरून यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?” त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल. जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही. मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला जिवे मारायला का पाहता?” लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे; तुला जिवे मारायला कोण पाहतो?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. मोशेने तुम्हांला सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे) व शब्बाथ दिवशी तुम्ही माणसांची सुंता करता. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले ह्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघडउघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकार्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.” ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” ह्यावरून ते त्याला धरण्यास पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. तेव्हा लोकसमुदायातील बर्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?” लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले.
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.” ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय? तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?” मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)
लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, “हा खरोखर तो संदेष्टा आहे.” कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय? ‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?” ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरायला पाहत होते. तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही. मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?” कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” त्यावरून परूशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहात काय? अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला, “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”
धडा २६
पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्या वेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]
पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” ह्यावरून परूशी त्याला म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही. तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
ह्यानंतर येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापांत मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे, तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला जे सांगत आलो तेच नाही का? मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो.” तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.”
तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” ते त्याला म्हणाले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही, पुत्र सदासर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता. मी माझ्या पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये करा; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारायला पाहता; अब्राहामाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “आमचा जन्म जारकर्मापासून झाला नाही. आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे.” येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. पण मी तुम्हांला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?” येशूने उत्तर दिले, “मला भूत लागले नाही; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. मी स्वतःचा गौरव करू पाहत नाही; ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला भूत लागले आहे हे आता आम्हांला कळले. अब्राहाम मेला व संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता, ‘जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’ आमचा बाप अब्राहाम मेला; त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? संदेष्टेही मेले; तुम्ही स्वतःला काय समजता?” येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला तर तो माझा गौरव काहीच नाही; माझा गौरव करणारा माझा पिता आहे; तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता. तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो; आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला; तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला.” तेव्हा यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.” ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.
धडा २७
तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला, आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?” कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे;” तो म्हणाला, “मी तोच आहे.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?” त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.” तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”
मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परूश्यांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता. म्हणून परूश्यांनीही त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी आली?” तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला. तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.” ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.” यहूद्यांनी त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईबापांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून आता डोळस झाला आहे, हे खरे मानले नाही. त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली?” त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे; तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा; तो वयात आलेला आहे, तो स्वत:विषयी सांगेल.” त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते. ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.”
मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.” ह्यावरून त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते.” ह्यावर त्यांनी त्याला म्हटले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?” त्याने त्यांना उत्तर दिले, “आत्ताच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही; पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?” तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक नाही.” त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, तो कोठला आहे हे तुम्हांला ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तर ह्याला काही करता आले नसते.” त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.
त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?” त्याने उत्तर दिले, “महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?” येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.” तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो,” आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.” परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.
धडा २८
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या-त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.” हा दृष्टान्त येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत; त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” ह्या शब्दांवरून यहूद्यांत पुन्हा फूट पडली. त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे; त्याचे तुम्ही का ऐकता?” दुसरे म्हणाले, “ही वचने भूतग्रस्ताची नाहीत; भुताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता; आणि येशू मंदिरामधील शलमोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही; जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे; आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.”
तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.” येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?” ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, - आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही . तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.” ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.” तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
धडा २९
तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत;बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत;
ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’ तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”
तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या; जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.” ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.” नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परूशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?” त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.” तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.” अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले. आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोर्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”
नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन ह्या भागात गेला. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.”
मोठ्याने म्हणू लागली, “अहो प्रभूजी, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.” तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
धडा ३०
नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सीदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिर्या-तोतर्या माणसाला त्याच्याकडे आणून, ‘आपण ह्याच्यावर हात ठेवा’ अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला; आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.” तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले. आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.” नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला.
त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या सात भाकरी घेतल्या व उपकारस्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे चार हजार पुरुष होते; त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला.
मग परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’ आणि तुम्ही सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेचच म्हणता, ‘पावसाची सर येत आहे,’ आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा ‘कडाक्याची उष्णता होईल,’ असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही? आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही? नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.” तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.
धडा ३१
मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व ‘आपण त्याला स्पर्श करावा’ अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?” तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले; तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस.”
नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” ते म्हणाले, “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया, किंवा संदेष्ट्यांतील कोणीएक, असे म्हणतात.” तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की, “मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.”
तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”
मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.” मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्या वेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’ मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
धडा ३२
ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते; ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’ हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले तेव्हा येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, ‘मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका. हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “मग एलीया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?” त्याने उत्तर दिले, “‘एलीया’ येऊन सर्वकाही ‘यथास्थित’ करील हे खरे; पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया तर आलाच आहे आणि त्यांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले; त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.” तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याविषयी हा आपणांस सांगतो, हे शिष्यांच्या ध्यानात आले.
नंतर ते शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?” तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.” ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.”
त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.” येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.” लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.” तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.” तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही. [तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.]
धडा ३३
नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसर्या दिवशी तो पुन्हा उठेल.”
नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?” त्याने म्हटले, “हो, देतो.” मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?” “परक्यांपासून,” असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि आधी वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”
नंतर आपल्यामध्ये मोठा कोण ह्याविषयी त्यांचा आपसांत वाद सुरू झाला. पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?” ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. येशूने त्यांच्या अंत:करणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले; मग त्याने त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”
योहान त्याला म्हणाला, “गुरूजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.” येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लगेचच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी पिण्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचीत सांगतो. त्या वेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?” तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय;
धडा ३४
मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! माझ्यावर विश्वास ठेवणार्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे ह्यात त्याचे हित आहे. अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार! तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक; दोन डोळे असून जेथे ‘त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही’ अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल, [व प्रत्येक बलिदान मिठाने खारवतील]. मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. [आणखी, जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे.] तुम्हांला काय वाटते? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचीत सांगतो. तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.”
तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’ आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खचीत सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचीत सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.
म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’ तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’ तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’ ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दु:खी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.”
धडा ३५
पुढे असे झाले की, त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले; तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले; पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभूजी, ‘आकाशातून अग्नी पडून’ त्यांचा ‘नाश व्हावा’ म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?” त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसर्या गावास गेले.
तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत. ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”
नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”
नंतर ते बाहत्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही. तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.” त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.” अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” मग पाहा, कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?” त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने ‘प्रीती कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’ त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.” परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसर्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ‘ह्याची काळजी घ्या; आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’ तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?” तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
धडा ३६
मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.” प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा : “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.] आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे; आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”
लोकसमुदायातील कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” तो त्याला म्हणाला, “गृहस्था, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले?” आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’ मग त्याने म्हटले, ‘मी असे करीन; मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’ परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’ जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”
तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या; आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा. आणि धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य; मी तुम्हांला खचीत सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसर्या किंवा तिसर्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”
तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभूजी, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल, तर तो वाट पाहत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील, आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील.
मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे; ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास; आतापासून एका घरातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप व ‘बापाविरुद्ध मुलगा,’ मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, ‘सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून’ अशी फूट पडेल.”
त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला, ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञांत मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले. मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.” किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
त्याने हा दाखला सांगितला, “कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते; त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’ तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’
धडा ३७
तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’ तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’ परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’ तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.”
त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’ यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”
तो एका शब्बाथ दिवशी परूश्यांतील कोणाएका अधिकार्याच्या घरी भोजनास गेला, तेव्हा असे झाले की, ते त्याच्या पाळतीवर बसले होते. आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्र्यांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?” तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?” तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.
तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस; कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल; मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस; म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस’; म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”
मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणीएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य!” त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. आणि जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’ मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’ धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हांला सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”’
धडा ३८
त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’ जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.” मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला : “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो; आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो. तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”
आणखी तो म्हणाला, “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मी योग्य नाही; आपल्या एका मोलकर्याप्रमाणे मला ठेवा.’ मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’ पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले.
त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे; आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’ तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला; परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ त्याने त्याला म्हटले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’
धडा ३९
मग त्याने शिष्यांनाही म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याच्यावर, हा तुमची संपत्ती उडवतो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’ मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड.’ नंतर दुसर्याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’ अन्यायी कारभार्याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसर्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”
धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.
कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत. पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’ मग तो म्हणाला, ‘तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव; कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’ पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’ तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’
मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आताच येऊन जेवायला बस.’ उलट ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी,’ असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”
धडा ४०
मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.” त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले. त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?” तेव्हा त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही; ‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही. ते तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका; कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे. नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवात गेला’ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.
तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते; परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी ‘मागे फिरू नये.’ लोटाच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.” त्यांनी त्याला म्हटले, “प्रभूजी, कोठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.” म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. त्यांनी त्याला म्हटले, “प्रभूजी, कोठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.”
त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे; आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’ पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.”’ तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा : “एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’ जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’ मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.”
धडा ४१
मग असे झाले की, हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहूदीया प्रांतात गेला; तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला. परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’, व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’ ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो; आणि जर तिने आपल्या नवर्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.” शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.” तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणांस नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.” नंतर त्याने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले; परंतु शिष्यांनी आणणार्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.” तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.
मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.” तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’ तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?” येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये.”
परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!” तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही; ‘देवाला सर्वकाही शक्य आहे.”’
तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल. देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,
अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.”
म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला. आणि त्याने कामकर्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो तिसर्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ आणि ते गेले. पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’ ते त्याला म्हणाले, ‘आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. जे योग्य ते तुम्हांला मिळेल.’ मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभार्याला म्हणाला, ‘कामकर्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे.’ तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया-रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांनाही रुपया-रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, ‘ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांला व त्यांना आपण सारखे लेखले.’ तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही; तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग; जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’ ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील.
धडा ४२
मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले, त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल; ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.
जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?” ते त्याला म्हणाले, “घेववेल.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे; पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे; आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले.
नंतर ते यरीहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता, तीमयाचा मुलगा बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.” तेव्हा हा नासरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, “धीर धर; ऊठ, तो तुला बोलावत आहे.” तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरूजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.” येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’
ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’ मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणार्यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.” ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता.
धडा ४३
बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. म्हणून, तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?” येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.” ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.” तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, “आपणही ह्याच्याबरोबर मरायला जाऊ.”
येशू आला तेव्हा त्याला कळले की, त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता; तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?” ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.” असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली.
येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले. मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!” परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?” येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.” असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” मरीयेकडे आलेल्या यहूद्यांनी येशूने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;
पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. मुख्य याजक येशूला ठार मारण्याचा कट करतात ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.” तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.” हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहूदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला; आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांस शुद्ध करून घ्यायला बाहेरगावांहून वर यरुशलेमेस गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?” मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”
धडा ४४
मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानीस आला. जो लाजर मेला होता व ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था वाढत होती; आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणार्यांपैकी एक होता. तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एक जण यहूदा इस्कर्योत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही?” त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला. ह्यावरून येशूने म्हटले, “हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.” तो तेथे आहे असे यहूदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरता नाही तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यांतून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकले.
ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की, “समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा. आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’ तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले. तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?” येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’ आमचा बाप दावीद ह्याचे [प्रभूच्या नावाने] येणारे राज्य धन्यवादित असो; ‘उर्ध्वलोकी होसान्ना.”’ नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’ “हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस; पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप .मग परूशी एकमेकांना म्हणाले, “तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.” नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला
दुसर्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?”
मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका उलथून टाकल्या; त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.” मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले; व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला.
धडा ४५
मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. [परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]”
तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. एके दिवशी तो मंदिरात लोकांना शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलमंडळासह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसांपासून होता ह्याचे मला उत्तर द्या.” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले : ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ आणि मनुष्यांपासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खातरी आहे.” आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.” तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.
म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. यहूदीयात आढळलेला अविश्वास त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे : “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही; ह्या कारणाने यशया आणखी म्हणाला : “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला. असे असूनही अधिकार्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते; कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला
तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्यांविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे; म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
धडा ४६
मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे! एका मनुष्याला दोन मुलगे होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, ‘जातो महाराज;’ पण तो गेला नाही. मग दुसर्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “दुसर्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातात. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पस्तावा झाला नाही.
आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. पुन्हा त्याने तिसर्याला पाठवले; त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले.
शेवटी ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’ असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला जिवे मारू व ह्याचे वतन घेऊ.’ तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?” ते त्याला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसर्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने लावून देईल.” येशू त्यांना म्हणाला, ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे’ असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.” त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे.’ असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.” मुख्य याजक व परूशी त्याचे दाखले ऐकून, हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते.
येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली; आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’ तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’ मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्यांनी भरून गेला. मग राजा जेवणार्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”
नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.
धडा ४७
नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला मग दुसर्याने ती केली व तो निःसंतान असा मेला. मग तिसर्यानेही; ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले; तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.” तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.” हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले.
त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’ आणि ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’ आणि ‘संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे’ आणि ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती करणे’ हे सर्व ‘होमार्पण व यज्ञ’ ह्यांपेक्षा अधिक आहे.” त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.
परूशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” कारण दावीद स्वत: स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणीही धजला नाही. हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती.
तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परूश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता! तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.”
तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.” तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही. तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.” तेव्हा सर्व लोक ऐकत असता त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “शास्त्र्यांसंबंधाने सावध असा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवण्यास हवे असते; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात; ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”
धडा ४८
तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात; जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल.
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्यांनाही आत जाऊ देत नाही. [अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.] अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, ‘कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो; आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्याची शपथ घेतो; आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्याची शपथ घेतो.
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता; आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’ तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;
ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’ मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.”
धडा ४९
मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”
मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, त्याने म्हटले, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.” नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.” येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही. “‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत.
तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल. तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. ते तुम्हांला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील; आणि तुमच्यातील कित्येकांना जिवे मारतील, तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.
परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे; जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत. त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’ तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
धडा ५०
त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे. ह्यास्तव कोणी तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो अरण्यात आहे,’ तर जाऊ नका; तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो आतल्या खोल्यांत आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील. परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’ आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील. ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने घाबरी होऊन पेचात पडतील; भयाने व जगावर कोसळणार्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; कारण ‘आकाशातील बळे डळमळतील.’ तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील; ‘कर्ण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांना पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांना ‘चार्ही दिशांकडून जमा करतील.’ ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”
अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हांला खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील. जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल; कारण तो अवघ्या ‘पृथ्वीच्या’ पाठीवर ‘राहणार्या’ सर्व ‘लोकांवर’ त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणार्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.” तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.
तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाण्यास निघाल्या. त्यांत पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही; शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’ मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही; तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे.’ त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’ म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
धडा ५१
कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली ,एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’ मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’ त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता; म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल; आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या; कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’ त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’ तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’
मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’ त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’ तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’ ‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’
धडा ५२
बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता. मग दोन दिवसांनंतर ‘वल्हांडण व बेखमीर भाकरी’चा सण होता मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला; आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.”
तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. तेव्हा कित्येक जण आपसांत चडफडून म्हणाले, “ह्या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली?” कारण “हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयांना विकून ते गोरगरिबांना देता आले असते.” अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हांला त्यांचे बरे करता येते; परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.”
तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला; तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने त्यांना सांगितले, “पाहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल; तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्यामागून जा; आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, ‘गुरूजी तुम्हांला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ मग तो तुम्हांला सज्ज केलेली मोठी माडी दाखवील; तेथे तयारी करा.” मग शिष्य निघून गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
धडा ५३
मग संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर आला. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा.” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत.” कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता; म्हणून तो म्हणाला, ‘तुम्ही सगळे जण शुद्ध नाहीत.’
मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणार्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत; तरी ‘ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.” आणि ते सर्व जण त्यातून प्याले.
धडा ५४
आणि ते बसून भोजन करत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे.” तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?” त्याने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा ते आपसांत विचार करू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता; म्हणून ज्याच्याविषयी तो बोलला तो कोण आहे हे आम्हांला सांग, असे शिमोन पेत्राने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” येशूने उत्तर दिले, “मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे.” मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.” आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करायचे ते लवकर करून टाक.” पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावेत किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे, असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला; त्या वेळी रात्र होती.
तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, “आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे; देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील; तो त्याचा लवकर गौरव करील. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल; आणि जसे मी यहूद्यांना सांगितले की, ‘जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही,’ तसे तुम्हांलाही आता सांगतो. मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
आणखी त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले, “पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले.
शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने उत्तर दिले, “मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही; पण तू नंतर येशील.” पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.” आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्यासारखा असावा. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्यासारखा आहे. माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.” मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.” तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.”
धडा ५५
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले.
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.” थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?” येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”
फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.”
यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वत: आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?” येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही; परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.
धडा ५६
मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे; तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.
जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हांला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. ‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील; परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत. मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते; परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. जी कृत्ये दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल; आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात.
म्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो. परंतु ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि ‘आपण कोठे जाता?’ असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील : ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी; मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी; आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी, मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील.
थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही; आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. [कारण मी पित्याकडे जातो.]” ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “हा आम्हांला, ‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो,’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?” ते म्हणत होते, “‘थोड्या वेळाने,’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही.” आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत.
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल. आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.” त्याचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते, आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.” येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”
धडा ५७
ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर; कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे.
कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
धडा ५८
हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यांना बरोबर घेतले आणि तो व्याकूळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या जिवाला’ मरणप्राय ‘अति खेद झाला आहे;’ तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की, ‘शक्य असेल तर ही घटका माझ्यावरून टळून जावो.’ “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” आणखी त्याने दुसर्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
तो बोलत आहे इतक्यात बारा जणांपैकी एक म्हणजे यहूदा तेथे आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील ह्यांच्याकडची एक टोळी तलवारी व सोटे घेऊन आली. ही जागा त्याला धरून देणार्या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मीच तो आहे.” त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्याबरोबर उभा होता. “मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, “कोणाला शोधता?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
त्याला धरून देणार्याने तर त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेई तोच तो आहे; त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” तो बोलत आहे, त्यात यहूदा नावाचा बारा जणांतला एक जण त्यांच्यापुढे चालत होता; तो येशूचे चुंबन घेण्यास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?” मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?” शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.
धडा ५९
जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय? मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.” पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. तेव्हा कोणीएक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालला होता, त्याला त्यांनी धरले; परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्यांच्यापासून उघडाच पळून गेला.
मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती .पेत्र येशूला नाकारतो .तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले. येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा मी काय बोललो ते. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे.” त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?” तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
मग येशूला अटक करणार्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.” पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.” काही वेळाने दुसर्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना. बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना. काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, “हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.” तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”’ त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही; आणि मी विचारले तरी तुम्ही मला उत्तर देणार येशू म्हणाला, “मी आहे; आणि तुम्ही ‘मनुष्याचा पुत्र सर्वसामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला’ व ‘आकाशातील मेघांसह येत असेलला’ असा पाहाल.” तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.” तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.” तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, “अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?”
धडा ६०
नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. ह्यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.” पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”
तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले.
तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.” तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले. आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बर्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते.
मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही; हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले; आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.” ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही.” यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांला नियमशास्त्र आहे; आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”
पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. पिलाताने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?” येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.” ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.” हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता.
धडा ६१
सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणीएक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे; म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.” इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.
सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.” सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.” तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.” मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात.
मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?” त्याच्याबरोबर दुसर्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले.
धडा ६२
मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता. [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.] तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती. तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर ‘मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले,’ असे लिहा.” पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एकेक वाटा असे चार वाटे केले; त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे;” हे ह्यासाठी झाले की, “त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या,” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. मग जवळून जाणार्यायेणार्यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.” तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.” लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.”
वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.” परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” मग तो म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले; थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली; आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.
धडा ६३
तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’ त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या; तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसर्याचे पाय मोडले; परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. “त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसर्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”
ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता. यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले; आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन विचारले, “त्याला मरून बराच वेळ झाला की काय?” शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले. त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.
दुसर्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले, “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून तिसर्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
धडा ६४
नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?” तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यांतून उठला आहे; पाहा, तो तुमच्याआधी गालीलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल; पाहा, मी तुम्हांला हे सांगितले आहे.”
त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही. मग असे झाले की, त्याविषयी त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा; ते असे की, मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसर्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.” तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली; तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या. मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, “कल्याण असो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका; जा माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.” आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या मग्दालीया मरीया, योहान्ना व याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसर्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले; परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली; व ते त्यांनी खरे मानले नाही.
त्या जात असता, पाहा, पहारेकर्यांतील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, ‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले,’ असे म्हणा; आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करू.” मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.” ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला; त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहचला व कबरेत शिरला; आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. कारण ‘त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे’ हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले.
इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये!” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे गुरूजी!) येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही.
धडा ६५
त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकार्यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही, तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की, आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले; व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. मग आमच्याबरोबर जे होते त्यांपैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले; पण त्यांना तो दिसला नाही.”
मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?” मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्याजवळ ते आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखवला; परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा; कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहायला आत गेला. मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले; मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” मग त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले, तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.” मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. अकरा जण जेवायला बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला; आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंत:करणाचा कठीणपणा ह्यांविषयी त्यांना दोष लावला. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?” मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा [व मधाच्या पोळ्याचा काही भाग] दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला. मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”
तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले; आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्या दिवशी मेलेल्यांतून उठावे, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.” येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
येशू आला तेव्हा बारा जणांतील एक म्हणजे दिदुम1 म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसर्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.” मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.” थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!” येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.” ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.
धडा ६६
त्यानंतर तिबिर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालीलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता, शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून मचव्यात बसले; पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नाही.” त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हांला सापडेल; म्हणून त्यांनी ते टाकले, तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढत ओढत होडीतून आले, (कारण ते किनार्यापासून दूर नव्हते, सुमारे दोनशे हातांवर होते). मग किनार्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले; तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्यास शिष्यांतील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली; तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ.
त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.” पुन्हा दुसर्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी मेंढरे पाळ.” तिसर्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार. मी तुला खचीत खचीत सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वत: कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास; परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल.” तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला; आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.”
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे?” असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्याला म्हटले, “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” ह्यावरून तो शिष्य मरणार नाही ही गोष्ट बंधुवर्गामध्ये पसरली; तरी ‘तो मरणार नाही’ असे येशूने त्याला म्हटले नव्हते; तर “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” असे म्हटले होते. जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो व ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहीत आहे.
त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा; कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.” मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले; आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की, तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.” तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले; आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.
ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता. आमेन.